श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 160 ☆ संत निळोबा राय…☆ श्री सुजित कदम ☆
संत तुकाराम शिष्य
सांप्रदायी वारकरी
संतकवी निळोबा हे
विठू भक्त खरोखरी…! १
संत निळोबा धार्मिक
प्रती पंढरपुरात
सेवा भावी पांडूरंग
निळोबांच्या अंतरात…! २
अहमद नगरात
जन्म पिंपळ नेरात.
घोडनदी काठावर
सेवा राम मंदिरात…! ३
मनोभावे पूजा अर्चा
कुलकर्णी वतनात
पंढरीच्या वारीसाठी
रामराम वतनास….! ४
गुरू प्रती श्रद्धा भाव
सुरू केली देहू वारी
एकोणींशें अभंगांनी
केली साहित्याची वारी…! ५
भक्ती भावना जागृत
बुक्का लावला कपाळी
बरा झाला रोग आणि
पांडुरंग नाम ध्यानी…! ६
भुला गाजरे पाटील
झाला मुक्त रोगातून
दिली हरीनाम मात्रा
हरी भक्ती बुक्क्यातून..! ७
लग्नामध्ये लेकीच्या रे
राब राबलासे हरी
विठू गडी होऊनीया
वावरला लग्नघरी….! ८
निळोबांची ऐसी ख्याती
पांडुरंग चमत्कार
उभारले देवालय
प्रती पंढरी साकार…!९
निळोबांचे पंचप्राण
तुकाराम महाराज
समाधिस्थ होता तुका
सोडी अन्नपाणी काज…! १०
संत निळोबा रायांना
पांडुरंग साक्षात्कार
संकीर्तन प्रवचनी
केला प्रचार प्रसार…! ११
आहे पिंपळ नेरात
संत निळोबा समाधी
पांडुरंग कृपा छाया
संत निळोबा उपाधी….! १२
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈