श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 189
☆ काचेचे घर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
तुझ्या स्मृतीचा मेघ मनातून जातच नाही
मेघामधुनी बरसत आता प्रेमच नाही
☆
समृद्धीच्या प्रदूषणाचा खूप धुराळा
श्वास मोकळा घेता येथे येतच नाही
☆
जुनी तोडली नवीन झाडे लावत आहे
नवीन झाडे तशी सावली देतच नाही
☆
लाज झाकण्या जावे कोठे काचेचे घर
अशा घराला कुठे लाकडी दारच नाही
☆
ध्यानधारणा करावयाला शिकलो आता
मनात साचत अहमपणाचा केरच नाही
☆
वादळ झाले फांदीवरचे पान गळाले
दूर उडाले पुन्हा जन्मभर भेटच नाही
☆
तू अश्रुंची फुले उधळली आहे ज्यावर
खरे सांगतो ते तर माझे प्रेतच नाही
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈