श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 162 ☆ संत कनक दास…☆ श्री सुजित कदम ☆
कर्नाटक राज्यामध्ये
धनगर कुटुंबात
जन्म कनकदासांचा
संतकवी साहित्यात….! १
नवे घर बांधताना
सापडले गुप्त धन
सोने चांदी जवाहिर
हिरे रत्न मण मण…! २
हंडा सुवर्ण धनाचा
जनलोकी केला दान
झाला कनक नायक
समाजाचे कृपादान…! ३
झाला ईश्वरी आदेश
माझा दास व्हावे आता
मान्य केले थिमाप्पाने
झाला दास केशवाचा…! ४
परमेश नाही असे
जगामध्ये नाही स्थान
कनकाच्या उत्तराने
गुरू कृपा वरदान…! ५
बांधियले देवालय
कृपादृष्टी ईश्वराची
केशवाच्या मंदिरात
पुजार्चना नायकाची…! ६
व्यासराया केलें गुरू
तलावांचे खोदकाम
यमराज अवतार
रेडा रेडा जपनाम…! ७
दूर केला अडसर
हलविले पाषाणास
व्यास समुद्र तलाव
रेडा आला सहाय्यास….! ८
सामाजिक एकात्मता
हरिभक्ती कथासार
दंड नायक थिमाप्पा
दास कनक साकार…! ९
मोक्षप्राप्ती मिळविण्या
करा त्याग स्वार्थ सोडा
अहंकार मीपणाचा
नाते ईश्वराशी जोडा..! १०
गीत रचना धार्मिक
सामाजिक एकात्मता
विष्णु भक्ती कृष्ण स्तुती
हरिभक्ती तादात्म्यता…! ११
देई ईश्वर दर्शन
काल भैरव रूपात
ओळखले नाही कुणी
नाही दर्शन कुणास….! १२
नाना लिला चमत्कार
व्यंकटेश आशीर्वाद
दिला पितांबर शेला
तिरूपती सुसंवाद…! १३
देण्या दर्शंन भक्तांस
कृष्ण मुर्ती फिरे पाठी
झालीं पश्चिमा भिमुख
कष्णमुर्ती दासासाठी…! १४
कनकाच्य खिडकीची
आहे प्रासादिक स्मृती
कींडी कनक भिंतीत
प्रासंगिक आहे श्रृती….! १५
छंदोबद्ध रचनांचा
ग्रंथ हरिभक्त सार
दास दासांचा कनक
अनुभवी ग्रंथकार…! १६
नल चरीत्र लेखक
रमे कथा कीर्तनात
कण कण मंदिराची
आठवण अंतरात…! १७
पद नृसिंह स्तवन
रामधान्य चरीत्रात
अध्यात्मिक उंची होती
कनकांच्या साहित्यात….! १८
कार्य कनक दासांचे
जन कल्याणाचा वसा
दासकूटा संप्रदाय
वैचारिक शब्द पसा…! १९
घाव टाकीचे सोसले
अंगी आले देवपण
संत कनक दासांचे
दिर्घायुषी सेवार्पण..! २०
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈