श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 190
☆ सराव… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
दुःखांत पोहण्याचा इतका सराव आहे
वाट्यास खूप छोटा आला तलाव आहे
☆
मी सोसल्या उन्हाचे दुःख का करावे ?
त्या तप्त भावनांशी माझा लगाव आहे
☆
केला विरोध जेव्हा मी भ्रष्ट यंत्रणेचा
नाठाळ एक झाले आला दबाव आहे
☆
मारून त्या बिचाऱ्या गेले टवाळ सारे
आता सभोवताली जमला जमाव आहे
☆
उपवास नित्य शनिचा केला जरी इथे मी
हट्टी ग्रहा तुझा रे वक्री स्वभाव आहे
☆
दारी तुझ्या प्रभू मी याचक म्हणून आलो
झाली तुझी कृपा अन् सरला तनाव आहे
☆
यात्रा करून येथे थकलेत पाय माझे
दारात ईश्वराच्या पुढचा पडाव आहे
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈