श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 164 ☆ संत कान्होपात्रा…☆ श्री सुजित कदम ☆
कान्होपात्रा कवयित्री
शामा नर्तिकेची लेक
गाव मंगळवेढ्यात
जन्मा आली संत नेक…! १
अप्रतिम लावण्याने
कान्होपात्रा आकारली
पुर्व पुण्याई लाभती
विठू भक्ती साकारली…! २
नायकीण पेशाची त्या
मोडुनीया परंपरा
कान्होपात्रा जपतसे
विठू भक्ती भाव खरा…! ३
देह मंदिराचा सोस
त्यागुनीया झाली संत
संकीर्तन प्रवचन
चिंतनात भगवंत…! ४
कान्होपात्रा घेई भेट
ज्ञानेश्वर माऊलींची
संत संगतीचा लाभ
ठेव कृपा साऊलीची…! ५
केले अभंग गायन
हरीनामी सदा दंग
गावोगावी पोचवीला
अंतरीचा भक्ती रंग…! ६
तेहतीस अभंगाचे
कान्होपात्रा निजरूप
संत सकल गाथेत
प्रकटले शब्द रुप….! ७
नित्य पंढरीची वारी
पदोपदी हरीभक्ती
घात केला सौंदर्याने
नाही जीवन आसक्ती…! ८
बिदरचा बादशहा
करी तिची अभिलाषा
शील रक्षणाच्या साठी
बदलले मूळ वेषा..! ९
वेष बदलून गेली
कान्होपात्रा महाद्वारी
भोग लालसा यवनी
पाठलाग अविचारी…! १०
पांडुरंगी झाली लीन
पंढरीत समर्पण
भक्तीभाव अभंगाने
केले जीवन अर्पण…! ११
© श्री सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈