सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ बंगला… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
मला वाटते नको बंगला
बाग बगीचा रहावयाला
मनी असू दे विस्तृत जागा
ह्या अवघ्या विश्वाला
आरसपानी निर्मळ मन हे
परोपकारासाठी झटावे
हात धरुनी दुबळ्याचा हो
दीप होउनी पुढे चलावे
नको भुकेले कोणी रहाया
घास भुकेल्या मुखी भरवावा
एक दाणा मिळून खावा
मनोमनी आनंद भरावा
गंध दरवळू दे सुमनांचा
कधी नसावा विकल्प हेवा
मनाच्या या बंगल्यात
सदैव मोद नांदावा
परमेशाचे धाम मन हे
सदैव राहो शुद्ध आचरण
दया क्षमा शांती वसू दे
मन आत्म्यासी समर्पण
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈