श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ वात… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
काय आलं ,काय गेलं,
काय घेतलं काय दिलं
माझं मी गणित मांडलं,
तेव्हा मला कळून चुकलं
माझं मीच सर्वस्व माझं,
तुझ्याकडे गहाण टाकलं
आत्माहीन कलेवर,
फिरत साऱ्या घरभर ,
उगीच आस वेडी म्हणते,
अजून थोडा धीर,
माणुसकी वर प्रेम कर
दुसऱ्यासाठी जगून मर,
तुझं माझं एक गाव,
एकरूप जगणं एकच ठाव,
,ऐलतीर पैलतीर जोडते
पाणी तोच स्वभाव,
दोन्ही देहात एकच भाव,
कुठलं वेगळं सांगणार नाव .
खरोखर त्वरा कर ,
नको थांबू मार्ग धर,
जगण्याचं एक साधन म्हणून ,
देहावरती प्रेम कर,
होऊन उंच आभाळभर ,
मातीमध्ये मूळ धर,
हात दे ,साथ दे , तुझ्या
प्राणांची ज्योत दे ,
जगण्यासाठी एकरूपतेची
नवी वेगळी जात दे
पणती मधल्या तेलाला या
जळण्यापुरती वात दे
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈