श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 165 ☆ संत भानुदास…☆ श्री सुजित कदम ☆
एकनाथ पणजोबा
नामांकित संतकवी
थोर संत भानुदास
ऋचा अभंगाची नवी…! १
सुर्यपुजा उपासक
भक्त विठ्ठलाचे खास
मुखी पांडुरंग नाम
हरिभक्ती सहवास…! २
मिळविली यश कीर्ती
कापडाच्या व्यापारात
संत भानुदास भक्त
पांडुरंग अंतरात…! ३
मनामध्ये भक्ती भाव
दृढ निश्चयाचे बळ
संत भानुदास रूप
परमार्थ चळवळ…! ४
परकीय आक्रमणे
तांडे यवनांचे आले
मठ देवळे फोडून
पीर दर्गे फार झाले…! ५
नाना अभंग आख्याने
भानुदास ग्रंथ सार
भक्तीभाव प्रबोधन
मनी विठ्ठल साकार…! ६
सेवाभावी भानुदास
प्रासादिक केली भक्ती
पांडुरंग आशीर्वादे
अभंगात दैवी शक्ती…! ७
भव्य देऊळ बांधले
राजा कृष्ण राय याने
नाम विठ्ठल स्वामींचे
शिलालेख कौशल्याने..! ८
नेली विजय नगरी
पांडुरंग पुजा मूर्ती
भानुदास प्रयत्नाने
पंढरीत विठू मूर्ती…! ९
घाली विठ्ठला साकडे
चला जाऊ पंढरीस
धीर धरा भानुदास
सांगे विठू समयास…! १०
तुळशीच्या हारासह
घाली गळा रत्नहार
विठ्ठलाने भानुदासा
दिला दैवी उपहार…! ११
गळी हार पाहुनीया
ठरवीले दासां चोर
झाली पांडुरंग कृपा
विठू भक्ती ठरे थोर…! १२
बंदी केला भानुदास
मृत्यू दंड सुनावला
व्यर्थ आळ भक्तांवर
पांडुरंग रागावला…! १३
सोडूनीया राजधानी
विठू आला पंढरीत
भानुदास दोषमुक्त
लीन झालासे वारीत…! १४
भानुदास आळवणी
विठू भानुदासा सवे
पांडुरंग पुजा मुर्ती
परतले रुप नवे…! १५
भानुदासी कुळामध्ये
पुन्हा जन्मे जगन्नाथ
विष्णु देव अवतार
तेची संत एकनाथ….! १६
पंढरीत महाद्वारी
गरुडाच्या मंडपात
संत भानुदास रूप
चिरंतन पादुकात….! १७
कार्तिकाची एकादशी
पुण्यतिथी महोत्सव
संत भानुदास स्मृती
परंपरा रथोत्सव….! १८
© श्री सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈