श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ हे फूल कळीचे झाले गं… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
बालपणीच्या कुंजवनातून
यौवन पुलकित वैभव घेऊन
वसंत उधळीत आले ग
हे फूल कळीचे झाले गं
दिवस संपले भातुकलीचे
सत्य जाहले स्वप्न कालचे
नयनापुढती रूप तयाचे
कसे अचानक खुलले ग
हे फूल कळीचे झाले गं.
परीकथेतील परी मी झाले
राजपुत्र ‘ते’मनात ठसले
निशा लाजली,जरा हासली
खुणवीत मजला आली गं
हे फूल कळीचे झाले गं.
पाऊल पडते नव्या जीवनी
नव्या भावना येती खुलूनी
गीत प्रीतिचे नवे,माझिया
ओठावरती आले गं
हे फूल कळीचे झाले गं.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈