कवितेचा उत्सव
☆ विश्व नेत्रदान दिवस निमित्त – नवीदृष्टी… ☆ सौ. मुग्धा कानिटकर ☆
पाहू दे शोभा अरुणोदयाची
अन् यामिनीच्या कौमुदीची
सप्तरंगी इंद्रधनुच्या किमयेची
रंगावलीने सजलेल्या अंगणाची
कसा दिसतो रे थेंब वर्षावाचा
अन् धरतीवरी हिरवा गालिचा
कसा विहरतो मयूर उपवनी
अन् गाणारे कोकिळ मैना वनी
डोळे पाहतील रंग वात्सल्याचा
ज्याने अंत केला अंधत्वतमाचा
अन् घेतला वसा आदर्श तेजाचा
दृष्टी -अमृत देऊन अमरत्वाचा
सुंदर जग पाहण्यासाठी जगावे
परोपकारी होऊन संजीवन द्यावे
मृत्यू पूर्वी नेत्रदान करून जावे
मरावे परी दृष्टी रूपी उरावे
मृत्यू पूर्वी दान देऊन जा रे
दृष्टी -अमृत देऊन अमर हो रे
नको आता खंत नेत्रहीनतेची
मजा लुटू द्या या जीवनपटाची
© सौ. मुग्धा कानिटकर
विश्रामबाग, सांगली
फोन 9403726078
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈