☆ कवितेचा उत्सव ☆ अंदाज ☆ मेहबूब जमादार ☆
मला माझं म्हणून का जगता येईना
मनातल्या प्रश्नांच उत्तर काही मिळेनां….
कोणी म्हणेल मग कशाला केलं लग्न
स्वप्नात मी बायकोला हा विचारला प्रश्न
मी म्हणून टिकले तिचा हेका काही सुटेना…१
बसताय कुठे निवांत, पहिलं घ्या पोरानां
पेपर द्या फेकून डोळं जातील वाचतानां
पोराबाळांच घर आपलं एवढं पण कळेनां?..२
मी कुठे जायचं तर खर्चाचा पडतो भार
माहेरा जायचं की ती सदैव असतें तयार
मला सारं कळतं पण तिला का समजेना…३
कोणाशी बोलावे तर कोण ती तुमची
शंकाकुशंका ने हालत बिघडते माझी
होतो तळतळाट परी सांगावे कोणा?….४
थोडे कांहीं बोलले तर धरी अबोला
विनवले किती?सोडत नाही हट्टाला
म्हणे सोडतेे हट्ट पण घ्या मला दागिना….५
मी आजारी पडता घायाळ ती होते
रात्रभर बिछान्यावर बसून ती रहाते
अशा तिच्या वागण्याचा अंदाजच येईनां….६
वय वाढलं तसं प्रेम ही वाढू लागलं
आपणाला कोण? हे दोघानां पटू लागलं
आतां माझ्या शिवाय तिचं पान ही हलेनां….७
© मेहबूब जमादार
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈