श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 159 – संत जनाई – ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
दमा कुरुंडाई पोटी
गंगाखेड नगरीत।
स्वयंसिद्ध कवयित्री
जनाबाई जन्म घेत।
दमा ठेवी चाकरीस
दामा घरी जनाईस।
विठ्ठलाचे भक्त थोर
नामा भेटे जनाईस।
रोज दळण कांडण
शेणपाणी करी जनी।
साथ विठ्ठल भक्तीची
पांडुरंग ध्यानीमनी।
जैसा नामा तैसी जनी
सत्ता ज्यांची विठूवरी।
भक्तीसाठी जाते ओढी
शेला सोडून श्रीहरी।
ओव्या अभंग रसाळ
नित्य जनाई मुखात।
गावोगावी कीर्ती त्यांची
गुंजे जनमानसात।
सामान्यात असामान्य
अशी जनाईची ख्याती
संत कबिरांच्या कानी
गेली जनाईची कीर्ती ।
भारी अप्रुप वाटले
आले कबीर भेटीस।
शेण्यासाठी भांडणारी
पडे जनाई दृष्टीस।
शेण्यातुनी विठू नाद
कबिरांना ऐकविला।
नाम स्मरणाचा ऐसा
श्रेष्ठ भावार्थ दाविला।
एकनिष्ठ शिष्या शोभे
संत श्रेष्ठ नामयास।
देह ठेविला दासीने
नामदेव पायरीस।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈