श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ गाडा जगाचा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
कुणीच कुणाचं ऐकत नाही
कारण प्रत्येकजण बोलतोय
कुणीच कुणाला थांबवत नाही
कारण प्रत्येकजण धावतोय —
कुणीच कुणाला शिकवत नाही
कारण प्रत्येकजण शहाणा
स्वतः पडला उताणा तरी
शहाणपणाचा बहाणा —
कुणीच कुणाला फसवत नाही
तरी प्रत्येकजण फसतो
स्वतःच्याच फसव्या जाळ्यात
स्वत:च फसून अडकतो —
कुणीच कुणाला देत नाही
दुसऱ्याची खात्री वा भरोसा
स्वतःची स्वतःलाच नसते तेव्हा
तिसऱ्याची हमी देणार कसा —
तरिही या बिनभरोशी जगात
आशेचा एक किरण दिसला
बिगरमायच्या भुकेल्या तान्ह्यास
जवा तिसऱ्याच मायनं उराशी घेतला —
आपल्या चतकोरातला एक तुकडा
भिकाऱ्यास दुसऱ्या देतांना
दिसला जेव्हा एक भिकारी
माणुसकीच्या दिसल्या खुणा —
सारा समाज बिघडत नसतो
दहा वीस टक्के तरी माणूस असतो
त्याच्याच योगदानामुळे
जगाचा गाडा चालू राहतो —
© सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈