श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ ढग उतार… ☆ श्रीशैल चौगुले ☆
पुर्वेकडचे ढग आता
पश्चिमेस धावू लागले
वार्यासंगेच धुंद मन
आठवात गाऊ लागले.
मनावरचा ताबा थोडा
अल्लड झाला थकलेला
पावसासम डोळे आता
नजर शुन्यी रोखलेला.
आधार तुटे वादळात
अनावर भाव बेभान
यत्न करुन असमर्थ
हात तोकडे थेंब प्राण.
वाटले होते अजिंक्यच
आयुष्य स्वप्न मुक्त सारे
कोसळले ऋतूत प्रेम
काळीज भिजले,पिसारे.
सरतच गेले किनारे
झरत गेली दुःख दरी
पावसाळा कधी सुखाचा
सांजवेळी भरे अंतरी.
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈