सौ.मंजुषा आफळे
कवितेचा उत्सव
☆ भलरी गीत… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆
भलरी दादा भलरी
भलरी दादा भलरी
आल्या रिमझिम सरी
पेरणीला या लई भारी
खाचरात भरे पाणी
गाऊ या पाऊस गाणी
मनाला येई तरतरी
सपान आलं सामोरी
चिखलात माझी राणी
करते भात लावणी
मायेत भिजल्या पोरी
चमकती चंद्रकोरी
आनंदात ही धरणी
पहा देवाची करणी
दिवस आज भाग्याचा
गंध श्रावणसरींचा
रोपे खोचून भाताची
पूजा करूया लक्ष्मीची
प्रसन्न ती होईल गं
भरभरून देई गं
घास खाऊ या सुखाचा
भ्रतार माझ्या प्रितीचा
भलरी दादा भलरी
भलरी दादा भलरी.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈