सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ सत्य… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
जेव्हा जेव्हा दर्पणी बघते
आयन्यात मी रूप पाहते
सांगे दर्पण मजसी हासून
कशास बाई असे मुखवटे
यौवन आता तुझे संपले
वेलीवरचे फूलही सुकले
कशास आता रंगरंगोटी
केस रुपेरी भाळी चमकले
सुरुकुतलेले तुझे वदन
त्या वदनाला कशास आवरण
सर्वांगावर जरा पसरली
कुठे कुठे तू देशील लिंपण
उघड मनाच्या कवाडाला
स्वीकारून तू सत्याला
जगत रहा क्षण आनंदाचे
खुलवील तुझ्या रूपाला
सुविचारांचे देणे घेणे
तुझे हासणे तुझे बोलणे
सन्मान तुझ्या व्यक्तित्वाला
वदनावरती तेज विलसणे
घटका जाती पळे जाती
वय वर्षे हरवती
हरित तृणांच्या मनावरती
आयुष्ये खेळती
आरशाने कथन केले
सत्य उपदेशीले
कधीच नाही खोटे बोलत
आता मी जाणीले
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈