श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ घाम… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
सांगा कुठे कुणाच्या वचनात राम आहे ?
केलेत कर्म त्यांचे पदरात दाम आहे
वाचाळ वीर सारे झालेत ठार वेडे
जनतेस रूप त्यांचे दिसले तमाम आहे
होते हिरे कुणाचे लुटले कुणी कळेना
पण एकटा कसा हा बनला निजाम आहे
दिसतो वरून साधू मन आतले भिकारी
भरला मनात त्याच्या ठासून काम आहे
आहेत गोप गोपी साधेच भोवताली
त्यांच्यात गुंतलेला वेडाच शाम आहे
समता अजून नाही या द्वारकेत आली
घेवून दैन्य माथी फिरतो सुदाम आहे
देवा तुम्हीच सांगा तप साधना कराया
देशात आज कोठे आनंद धाम आहे
राबून खूप मेलो पोटात घास नाही
गळतो उगाच येथे फुकटात घाम आहे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈