कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 185 – विजय साहित्य
☆ मैत्री आपुली… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
मैत्री आपुली सांगून जाते
शब्दांच्याही पलीकडले.
नजरेमधुनी कळते भाषा
कसे जीवावर जीव जडले..!
मैत्री आपुली अनुभव लेणे
माणूस माणूस वाचत जाणे
स्नेहमिलनी स्वभावदोषी
दृढ मैत्रीचे चलनी नाणे.. . !
मैत्री आपुली नाही कौतुक
शिकवून जाते धडा नवा
कसे जगावे जीवनात या
लावून जाते नाद हवा.. !
मैत्री आपुलीआहे कविता
संवादातून कळलेली
अंतरातली ओढ मनीची
अंतराकडे वळलेली.. !
मैत्री आपुली हळवी जाणिव
परस्परांना झालेली
तू माझा नी मीच तुझा रे
मने मनाला कळलेली.. . !
मैत्री आपुली नाते आत्मिक
विश्वासाचे अजोड हात
सुखदुःखाच्या सर्व प्रसंगी
ओठी मित्रा तुझीच बात…!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈