सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ ‘श्रावण‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
हरिनामात दंगला, चिंब चिंब हा आषाढ,
दीपपूजेने उजळे, कसा सारा आसमंत!
बळिराजा गुंतलासे, काळ्या आईच्या सेवेत,
बीज रूजता मातीत, हिरवं सपान डोळ्यांत!
नाहू-माखूनी सचैल , भूमी झाली हो प्रसन्न ,
रानफुलांच्या गळ्यात, रंगे श्रावणाची धून!
सण पंचमीचा आला, सजे मेंदी हातावर,
नागोबाला पूजताना, कृतज्ञता हो मनात!
लेकी-सुनांच्या मनात, भाऊरायाचा आठव,
रक्षाबंधनाचा सण,त्याच प्रेमाची खूणगाठ!
सागराला शांतविण्या, केले नारळ अर्पण,
नाच-गाण्यांच्या तालात, होड्या चालल्या पाण्यात!
व्रत-वैकल्ये, उपवास, गोड-धोडाची पंगत,
झिम्मा-फुगडीचा ताल, मंगळागौरीचा जागर!
कृष्णजन्म, दहीकाला, बाळगोपाळ रंगात,
बैलपोळा नि पिठोरी, सरे श्रावणाचा मास!
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर