श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 204
☆ सूर्य तापला होता… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मी खोल तळ्याच्या काठी, चंद्रास निहाळत होतो
त्या स्पर्श न करण्याचेही, मी मनास सांगत होतो
☆
ती केसामध्ये माळून, यायची चांदणे सुंदर
केसात फुले नसताना, मीही गंधाळत होतो
☆
ती तळ शोधाया माझा, खोलात उतरली होती
मी तर पत्त्यांचे इमले, स्वप्नातच बांधत होतो
☆
तो सूर्य तापला होता, मज तेच पाहिजे होते
मी तव्यात त्याला धरुनी, मांडे भाजत होतो
☆
मी झोपायाला गेलो, डोळ्यांत सखी असताना
निद्रादेवी आलेली, मी तिलाच टाळत होतो
☆
मातीच्या भेगा दिसता, अश्रूंचा बांधच फुटला
त्या ओल्या जागेवरती, मी झाडे लावत होतो
☆
ती गुच्छ घेउनी आली, मज फुले नको ती होती
मी केवळ केसामधला, तो गुलाब मागत होतो
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈