श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 172 ☆ राखी… ☆ श्री सुजित कदम ☆
आताशा का कोणास ठाऊक..?
राखी पौर्णिमा म्हटलं की
डोळे भरून येतात कारण ..
मला अजूनही आठवतात
ते लहान पणी चे दिवस..
राखी पौर्णिमा असली की
मी सकाळी लवकर उठून ताईने
माझ्या हातावरती राखी बांधण्याची
वाट पहात बसायचो…
आणि माझ्यासारखीच ताई सुध्दा
ताईने हातावर राखी बांधली ना
की मला खूप
श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं आणि
आई नंतर कुणीतरी आहे
आपली काळजी घेणारं…
असं सहज मनात यायचं…!
लग्न करून जेव्हा ताई
सासरी गेली ना..
त्या नंतर सुध्दा
रात्रीचा प्रवास करून मी
राखी पौर्णिमेला सकाळीच
ताईला भेटायला जायचो …
तेव्हा ताई मला म्हणायची
एवढी दगदग कशाला करायचीस?
त्यावर मी तिला म्हणायचो
तू एकच बहीण आहेस माझी
तुझ्यासाठी मी कूठूनही येऊ शकतो
त्या वेळी राखी पौर्णिमेला ताईने
प्रेमाने मनगटावर बांधलेली राखी
पुढचं वर्ष भर मी मनगटावर
तशीच ठेवून द्यायचो
ताईची आठवण म्हणून…!
पण आता मात्र
राखी पौर्णिमा म्हटलं की
डोळे भरून येतात
आणि मोकळ्या मनगटावर
फक्त आसवांचे थेंब ओघळतात..!
© श्री सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈