सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ भूगंध… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
वादळ -वारे पिसाटले
भान विजांचेही सुटले
आभाळ खाली झुकले
रंगूनी झाले करवंदी
तडतड तडतड वाजे ताशा
घुमे विजांचा ताल जरासा
कैफ मैफिलीचा हवासा
मेघांची नभी दाटली गर्दी
झरझर झरझर धारा झरती
सतारींना हे सूर गवसती
वातलहरी ताल धरती
गाल धरेचे हो जास्वंदी
नभ धरणीची अभंग प्रीती
मेघ भरलेले रितेच होती
भूगंध उधळतो नभाप्रती
नभी काळ्या मेघांची गर्दी
निराशा गुंडाळे गाशा
पालवल्या हिरव्या आशा
मनी रुजव्याचा तेज कवडसा
सुगीचीच हो आता सद्दी
धरती झाली लावण्यवती
कूस तिची हो धन्य झाली
हिरवी स्वप्ने ही अंकुरली
झऱ्यांसंगे खळखळते नदी
****
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈