श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 171 – बंध आयुष्याचे ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
प्रेम धाग्यांनी विणले
धागेदोरे भावनांचे।
जीवापाड जपले मी
बंध माझ्या आयुष्याचे।
आई बाबा, ताई दादा
मऊ तलम ती माया
जीवनाच्या वणव्यात
माय पित्याची ती छाया।
गोड कवडसा जणू
मित्र मैत्रीणीचा संग।
दावी प्रतिबिंब खरे
भरी जीवनात रंग।
गुरुदेव माऊलीने
वास्तवाचे दिले भान।
ज्ञानामृत पाजूनिया
दिले सर्वस्वाचे दान।
कच्चा घागा तो प्रेमाचा
नकळत जुळायचा।
शब्दाविन भाव सारा
नयनात कळायचा।
गोड रुसवे फुगवे
इथे भांडणंही गोड।
दोन जीवांना बांधती
कच्चे घागे हे अजोड।
साद चिमण्या पिल्लांची
बालपण खुणावते।
तपश्चर्या मायबाची
प्रकर्षाने जाणवते।
सैल होता घागेदोरे
रितेपण हाता येई।
विसरलो परमेश्वरा
चरणाशी ठाव देई।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈