श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 207
☆ हळवा कोपरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
रात्र भिजली पावसाने, थांबना आता जरा
मातिच्या गंधात आहे, मिसळलेला मोगरा
☆
काल तू राहून गेला, ना पुन्हा डोकावले
आजही मी रिक्त जपला, तोच हळवा कोपरा
☆
दूर गेला तू जरासा, मी दिला आवाज पण
ऐकता आला तुला ना, शब्द होता कापरा
☆
प्रेमधारा काल निर्मळ, वाहणारी पाहिली
का प्रदूषित आज झाला, तोच प्रीतीचा झरा ?
☆
आग पाणी खेळण्याची, वाटली मज साधने
खोल पाणी त्यात होता, जीवघेणा भोवरा
☆
सर्व नाती सोडली मी, पूजले केवळ तुला
भेटण्याला होत आहे, जीव माझा बावरा
☆
काढले कोणी घरातून, काळजी नाही अता
मृत्युनंतर राखसुद्धा, राखते माझी धरा
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈