सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ निरोप… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
गणपती गौराईने
घर किती आनंदले
ब्रम्हांडीचे चैतन्य हे
घरामध्ये सामावले ||
गौरी गणेश पुजिले
कृपाप्रसाद लाभला
सालभरची शिदोरी
जीव किती सुखावला ||
जाई कुमती लयाला
चित्तवृत्ती आनंदल्या
प्रेम सख्य जोडूनिया
जपे कुटुंब स्वास्थ्याला ||
गौरी गणेशाची पूजा
केले मंगल औक्षण
सणांचे हे प्रबोधन
समाजहीत रक्षण ||
निरोप हा गौराईला
संगे निघे गणपती
मन जडावले फार
डोळे भरूनिया येती ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈