श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 175 ☆ कामगार…! ☆ श्री सुजित कदम ☆
परवा आमच्या कारखान्यातला
कामगार मला म्हणाला
आपण आपल्या हक्कासाठी
आदोलन करू.. मोर्चा काढू..
काहीच नाही जमल तर
उपोषण तरी करू…
पण..
आपण आपल्या हक्कासाठी
आता तरी लढू
बस झाल आता हे असं लाच्यारीने जगणं
मर मर मरून सुध्दा काय मिळतं आपल्याला
तर दिड दमडीच नाणं..
आरे..
आपल्याच मेहनतीवर खिसे भरणारे..
आज आपलीच मज्जा बघतात
आपण काहीच करू शकणार
नाही ह्या विचारानेच साले आज
आपल्या समोर अगदी ऐटीमध्ये फिरतात
आरे..
हातात पडणार्या पगारामध्ये धड
संसार सुध्दा भागत नाही…!
भविष्याच सोड उद्या काय
करायच हे सुद्धा कळत नाही
महागड्या गाडीतून फिरणार्या मालकांना
आपल्या सारख्या कामगारांच जगण काय कळणार..
आरे कसं सांगू..
पोरांसमोर उभ रहायचीही
कधी कधी भिती वाटते
पोर कधी काय मागतील
ह्या विचारानेच हल्ली धास्ती भरते
वाटत आयुष्य भर कष्ट करून
काय कमवल आपण..
हमालां पेक्षा वेगळं असं
काय जगलो आपण..!
कामगार म्हणून जगण नको वाटतं आता..!
बाकी काही नाही रे मित्रा..
म्हटल..एकदा तरी
तुझ्याशी मनमोकळ बोलाव
मरताना तरी निदान कामगार
म्हणून जगल्याच समाधान तेवढ मिळावं…!
म्हणूनच म्हटलं
आपण आपल्या हक्कासाठी
आदोलन करू… मोर्चा काढू…
नाहीच काही जमल तर
उपोषण तरी करू…पण
आपण आपल्या हक्कासाठी आता तरी लढू..
© श्री सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈