सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ गणेशवंदना… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
(सुरनिम्नगा – ललगालगा ललगालगा ललगालगा ललगालगा)
☆
कर जोडते तुजला सदा मन लावुनी नमते तुला
भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥
☆
प्रथमेश तू तुज वंदुनी पहिल्या पदा मग ठेवतो
कर पार तू विपदातुनी मनमंदिरी जप चालतो
गणनायका कर दूर तू तम माझिया जिवनातला
भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥
☆
तुझियामुळे सुख येतसे नलगे मना कसली तमा
चरणावरी शिर ठेवुनी करुणानिधी करते जमा
मज लाभता वर रे तुझा यश मार्ग हा सगळ्यातला
भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥
☆
सुर श्रेष्ठ तू असुरां अरी वरदान हे तुज लाभले
जन मानसी तव रूप हे भरुनी असे बघ राहिले
स्मर मोरया म्हण मोरया जयघोष हा तव भावला
भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥
☆
कर जोडते तुजला सदा मन लावुनी नमते तुला
भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈