सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ पड रं पावसा… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
पड रं पावसा पड रं पावसा
नको होऊस वैरी
भल्या आशेनं तुझ्या भरवशी
रानं आम्ही पेरली
होतं नव्हतं धान सरलं
पार तळ गाठला
पोटातल्या भुकेचा
कल्लोळ उरी पेटला
कारं वाद्या काय आडलं
काळ ढग कुठं दडलं
तुझ्या वाचून रान हिरवं
मान टाकून कलमडलं
धावून ये तू डोंगराआडनं
लागूंदे आभाळा गळ
तग धरूंदे शिवार माझं
लागून मातीला गर
सोया, भूइमूंग, जवार
पिक उभं डौलदार
फाटक्या पदरी टाक दान
सोड आभाळातनं धार
पड रं पावसा पड रं पावसा
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈