श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ एवढे तरी अध्यात्म… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
कधी मी आयुष्याला,
कधी आयुष्याने मला शोधलं .
पाठशिवणीचा निरर्थक खेळ.
दुःखाच्या उन्हांनी कधी ,
सुखाच्या सावलीला शोधण्यात-
व्यर्थ दवडला वेळ.
वाट पाहता पावसाची,
थकून गेले डोळे.
किती आले किती गेले,
पाण्याविना पावसाळे.
आता प्रयोजन जगण्याचे,
आयुष्यालाच विचारावे.
प्रत्येक ऋतू समजून घेत-
समजुतदार व्हावे.
कधीकधी चष्मा काढून ,
थोडफार डोळेही पुसावे .
तुका म्हणे उगी रहावे.
एवढे तरी अध्यात्म जमावे.
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈