☆ कवितेचा उत्सव ☆ वर अमृत स्वप्नांचा☆ सुश्री पूजा दिवाण ☆
सुख वाटता वाटता
पडो आभाळही थिटे
दुःख वाटण्या पहाता
हात हळू मागे तटे
दुःख ऐकण्या सदाच
श्रुती असावी तत्पर
दुःख कथिण्या कधीच
ओठी पडो न अंतर
दुःख ऐकता ऐकता
चिंब पापणी भिजावी
सुख ऐकता ऐकता
ओठी शीळ उमटावी
साद सुखात दुःखाची
कुणी कधी ना ऐकली
आस दुःखात सुखाची
कुणा कधी ना सुटली
असा फेर हा दैवाचा
मध्ये खांब मनुजाचा
मर्त्य तनुज मनूला
वर अमृत स्वप्नांचा
© सुश्री पूजा दिवाण
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈