सौ. प्रतिभा संतोष पोरे
कवितेचा उत्सव
☆ हे जीवना… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆
✒️
जीवन जणू एक
अनोखा निर्झर
रंग मिसळा कोणताही
एकरूप होई तत्पर ।
✒️
कधी उन्मेषाचे, उत्साहाचे
पडता कवडसे प्रकाशाचे
उजळे आनंद जल्लोषाने
जीवनातील क्षण प्रेमाचे ।
✒️
झकोळे दुःखाचा काळोख
थांबून जाई वाहती धारा
प्रकोप होता कधी वादाचा
अंतरातील तुटती तारा।
✒️
संपत नाही कधीच वाट
खाचखळग्यातील खडतर
दीपस्तंभ नसतो कधी
कापत नाही थोडेही अंतर ।
✒️
अपशब्दांची कधी
मिळते टोचणी
विखुरलेल्या नात्यांची
वेदनामय बोचणी ।
✒️
तरीही तरीही हे जीवना
तोडून टाक रे बंधना
ह्रदयीच्या आत्मबलाने
जिंक साऱ्या षडरिपूंना ।
✒️
सकरात्मकतेची बांध मोट
बहरू दे मनातील सृजना
खळाळून वाहू दे स्पंदना
मग उमगेल अर्थ जीवना ।
✒️
© सौ. प्रतिभा पोरे
पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈