श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ गझल ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
(वृत्त. . . वनहरिणी [मात्रा ८-८-८-८])
☆
चाल पाहिली प्रत्येकाची सरळ कुठे ती तिरकी आहे
सुख दुसर्याचे पाहुन जळतो त्याची नियती सडकी आहे
☆
तोंडावरती गोड बोलणे पाठीमागे माप काढणे
कोण बोलतो आपुलकीने बोलण्यात ही फिरकी आहे
☆
काल कसा घालवला आपण तीच आजची मिळकत नक्की
कुणास नाही टळली सगळी कर्मफलांचीच गिरकी आहे
☆
सुंदरतेच्या अवतीभवती वखवखलेल्या नुसत्या नजरा
मधुबाला बावरून जाते तिच्या उरी पण धडकी आहे
☆
सहजासहजी पुण्य घडेना पापाचा मुडदाच पडेना
वरचा असतो पहात त्याची सदाच उघडी खिडकी आहे
☆
© श्री विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈