सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ तो अन ती… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
दोघांचही आकाश
एकच असले तरी
त्याच्यासाठी ती
जमिनीवरच राहते
तो मात्र
आपल्याच आकाशात
किर्तीचे यान
यशाची विमाने
प्रगतीचे पंख
यांनी मुक्त संचार करतो
आकाशाला हात टेकले
असे त्याला आणि
इतरांनाही वाटते
पण आकाश नेहमीच
त्याला हूल देते
कितीही उंच आला तरी
हाती लागत नाही
पण ती मात्र
ठाम पणे जमिनीवरच
पाय रोवून उभी असल्याने
हेच धुलीकण
स्पर्शायला बहुदा
आकाशच येतं खाली
कधी कधी•••
मग वाटतं
आकाशा पर्यंत जाउनही
मातीच होते
पण•••
जमीनीवर राहूनही
आकाश होता येते
तुकोबां सारखे•••
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈