श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 212
☆ रुपाचा दाखला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
तुझ्यासाठी हा आरसा
किती वेडापिसा झाला
कधी येशील समोर
आहे वाटेत थांबला
खेळण्याला पदराशी
पहा वारा आतुरला
फडफडतो पदर
जेव्हा भेटतो वाऱ्याला
तुला पाहून असेल
का हा चंद्र डागाळला ?
अप्सराही देत होत्या
तुझ्या रुपाचा दाखला
धुके होते पेटलेले
धूर त्याचा पसरला
दव अंगाला झोंबते
त्याने देह भिजलेला
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈