मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ काढणी… ☆ मेहबूब जमादार ☆
☆
भिरभिरत्या वाऱ्यात
सारं रान डोलतं
येता पीक काढणीला
मन मनांत फुलतं
कस काळ्या मातीचा
अवघ्या पिकात फुलला
होता नजरा नजर
सारा शिवार खुलला
दिनरात केलं कष्ट
घामाचं झालं मोती
भुल पडे चांदण्याला
चांदाळून गेल्या राती
मन भरलं राजाचं
काळजा आलं उधान
दिल देवानं भरून
हरपून गेलंया भान
खाल्लं पाखरानी तरी
खळा भरून वहातं
माझा कष्टकरी राजा
नांदे सोनिया सुखात
☆
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈