सुश्री निलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ वारी चालली चालली… ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆
वारी चालली चालली
मनामधे भक्तिभाव
जणू हलता चालता
वारकर्यांचाच गाव
वारीचीया या गावात
कोणी नाही रंक राव
सारे माऊलीचे भक्त
मनी समानता भाव
भाळी चंदनाचा टिळा
गळा तुळशीची माळ
मुखी विठ्ठल विठ्ठल
डोळ्यामधे स्नेहभाव
समाजाचे सारे वर्ण
परी एक भाव मनी
सामाजिक समरसता
इथे प्रत्येकाच्या मनी
विठू सर्वांची माऊली
तीच उन्हात सावली
भार तिच्यावर सारा
माया तिच पायाखाली
नाही शीण चालताना
वाट सरे किर्तनात
विठू भरून राहीला
वारकर्याच्या मनात
© सुश्री निलांबरी शिर्के
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈