श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 215
☆ दोरी होती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मी दुःखाला उगा कशाला चिवडत बसलो
दोरी होती साप म्हणूनी बडवत बसलो
☆
शांत जळाची पारदर्शिता तळ दाखवते
भंग शांतता करून पाणी ढवळत बसलो
☆
डाग चांगले असे ऐकले कुठेतरी मी
कारण नसता चिखल मातिला तुडवत बसलो
☆
नवीन ढाबळ नवीन पक्षी जमा जाहले
विद्रोही पक्षांणा दाणे भरवत बसलो
☆
लोहारच मी दागदागिने मला न जमले
युद्धासाठी बर्ची भाले बनवत बसलो
☆
इंग्रज गेले मोगल गेले काळ लोटला
अजून त्यांचे कित्ते आपण गिरवत बसलो
☆
अधुनिकतेची खोटी स्वप्ने बघता बघता
संस्काराच्या नात्यालाही फसवत बसलो
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈