श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 216
☆ वाच चेहरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
वाच चेहरा कळेल तेव्हा कोडे आहे
सुटले कोडे म्हणणारे बाताडे आहे
☆
भांडण आणिक तंटा गावी होतच नाही
झुंजीसाठी पुष्ट पाळले रेडे आहे
☆
मी रक्ताच्या थारोळ्यातच पडून होतो
टांगा पलटी फरार झाले घोडे आहे
☆
गरीब घरची उपवर झाली लेक लाडकी
बाप झिजवतो दारोदारी जोडे आहे
☆
लग्न करूनी घरी आणली आम्ही दासी
लोखंडाचे तिला घातले तोडे आहे
☆
मोठे घर अन् पोकळ वासे वापरलेले
श्रीमंतांचे असेच सारे वाडे आहे
☆
नसा नसातुन वीज वाहते नाव काढता
छत्रपतींचे गातो मी पोवाडे आहे
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈