श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 217
☆ तुझ्यासारखा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
कधी वागतो अवखळ वारा तुझ्यासारखा
वादळ होता करतो मारा तुझ्यासारखा
☆
अंधारी ती रात्र छळाया मला लागली
कुठेच नव्हता प्रसन्न तारा तुझ्यासारखा
☆
अवकाळीच्या वर्षावाने चिंब नहाते
देतच नाही तो गुंगारा तुझ्यासारखा
☆
काय शिकवले सांगशील का वाऱ्या त्याला
त्यानेही केला पोबारा तुझ्यासारखा
☆
मी माहेरी आले आहे तुला सोडुनी
अन् बापाचा चढला पारा तुझ्यासारखा
☆
कष्ट सोसुनी घास आणतो अमुच्यासाठी
गोड वाटतो बाबा चारा तुझ्यासारखा
☆
आश्रमातला मनुष्य होता मला भेटला
वाटत होता तो म्हातारा तुझ्यासारखा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈