सौ शुभदा बाळकृष्ण पाटणकर
शिक्षण – एम.ए., बीएड.
☆ न्यू हायस्कूल’ यशवंत नगर येथे पंधरा वर्षे मराठी विषयाचे इ.आठवी ते दहावी साठी अध्यापन ☆ २०१० साली स्वेच्छा निवृत्ती. ☆ नाट्य शास्त्र डिप्लोमा.विद्यापीठात तृतीय क्रमांक. ☆ रंगभूमी दिन,सूरपहाटेचे, सांगली भूषण, अन्नपूर्णा पुरस्कार,विजयंत, संस्कार भारती, अशा अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि विविध संगीत कार्यक्रमासाठी निवेदन.
सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त निघालेल्या ‘ शतपदी’ अंकासाठी लेखन सदस्य म्हणून काम.
सांगली आकाशवाणी साठी ‘हृदयस्थ पुलं ‘ आणि गदिमांच्या स्मृतीदिनानिमित्त सादर केलेल्या रूपकाचे लेखन. संत मुक्ताई रुपक लेखन. ☆ मुंबई मधील आदीवासी पाड्यावरील मुलांसाठी निघणाऱ्या रानपाखरं. या त्रैमासिकासाठी लेखन.
दैनिक केसरी मधे फुलोरा पुरवणी साठी गेले वर्षभर सदर लेखन दर सोमवारी.सध्या दैनिक केसरी साठी दर सोमवारी कथा लेखन.पण सद्य परिस्थितीत पुरवणी बंद असल्यामुळे थांबले आहे.
सांगली जिल्हा नगर वाचनालय आणि महिला परिषद वाचनालय या संस्थेच्या संचालक मंडळांवर कार्यरत.
लेखन, निवेदन,प्रवास,-छंद. ☆ ब्राह्मण विकास संस्था, सांगली शिक्षण संस्था अंबाबाई मंदिर मिरज संस्थांकडून सन्मानित.
☆ कवितेचा उत्सव : घन सावळा सावळा.. ☆ सौ शुभदा बाळकृष्ण पाटणकर ☆
घन सावळा सावळा
मन आभाळी झरतो
ऋतू हिरवा हिरवा
मनातुनि बहरतो.
दूर नजर कडेला
माझा सोनेरी साजण
त्याच्या स्पर्शाने नाहले
ओलेचिंबसे अंगण ..
आड पानातून येते
साद त्याची मला नित
एका सुरावल्या क्षणी
ओठी येते त्याचे गीत..
विहरल्या पक्षिणीनां
ओढ सारी कोटराची
चिमुकल्या चोचीनाही
तृषा आता चाहुलीची..
वेळ परतीची आता
सांज धरेला टेकली
गंध फुलांची आरास
तृण पाती विसावली..
अंगणात वृंदावनी
दिवेलागणीची वेळ
दहा हातांनी घेतला
सारा आवरून खेळ..
संपवून सारी कामे
माय जराशी टेकली
तिला पाहत पाहत
पणती ही शांत झाली…..
© सौ शुभदा बाळकृष्ण पाटणकर
९०२८८१७४००
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर कविता
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
कविता छानच आहे.
आपल्या साहित्य चे स्वागत आहे.