श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 218
☆ सूर्य मावळला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
होता सूर्य मावळला, गेल्या वर्षाला घेऊन
काही बुडाले दारूत, होते सामिष खाऊन
☆
सारे नव्हतेच तसे, काही पहाटे उठले
नव्या वर्षाच्या सूर्याचे, त्यांनी दर्शन घेतले
त्याचे रूप पाहुनीया, मन जाते हे मोहून
☆
संध्या स्नान जे करून, अर्घ्य देतात देवाला
ऊर्जा सूर्यकिरणांची, सूर्य देतो त्या देहाला
आहे कोवळी किरणे, त्यात घेऊया न्हाऊन
☆
झाले जीवन गढूळ, शुद्ध संकल्प करुया
घडा पापाचा जरासा, चला रिकामा करुया
गेलेल्याच्यासोबतीने, जावे पापही धुऊन
☆
परप्रकाशी चंद्राला, नका कुणी नावे ठेवू
त्याच्यामुळे धुंद रात्र, त्याला कुशीमध्ये घेऊ
चंद्रावर जाणे सोपे, चला येउया भेटून
☆
स्वप्ने सत्यात येताना, आहे पाहतो हा देश
साऱ्या जगात पोचला, आहे आमुचा संदेश
असो संकटात कोणी, जातो देश हा धावून
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈