सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ जुने आणि नवे… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
जाणारे जुने असते
येणारे नाविन्यानी नटते
तारीख, वार ,महिने
आपल्या क्रमानेच येत असतात
येणाऱ्या दिवसाला मात्र
लेबल काळाचं लावून जातात
पलटलेल्या पानासोबत
काळ पुढे सरकत राहतो
बघता बघता नाही कळत
वर्षाचा शेवट कधी येतो
नव्या वर्षांच्या स्वागताला
एका रात्रीचा जल्लोष होतो
कधी श्वास मुठीत घेऊन
तर कधी कष्टात झिजून
कधी दु:खात, कधी सुखात
वर्षातला प्रत्येक दिवस
दिवसातला क्षण क्षण जगला जातो
आणि किती सहजतेने त्याला
आपण टाटा ,बाय-बाय करतो
जुनं कॅलेंडर उतरून ठेवून
भिंतीवरती नवे टांगतो
खरोखर इतके का सोपे असते
जुन्याला सहज घालवणे
नव्याला सहजतेने स्विकारणे
काळजातला अंधार मिटवून
आणि सुंदर पहाटेला जागवणे
तितकेच सोपे झाले नसते का
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक
घटका, दिवस, वार,महिने यांना
तितक्याच सुंदरतेने नटविणे
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈