कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 203 – विजय साहित्य
☆ दिव्य मात्रा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(काव्यप्रकार = अष्टाक्षरी रचना)
☆
केले नारीला साक्षर
दिली हाती धुळपाटी
ज्योतिबाची साऊ लढे
महिलांच्या हक्कांसाठी..! १
☆
साऊ साक्षर होऊनी
शोधू लागे निरक्षर
कर्मठांच्या विरोधात
करी महिला साक्षर…! २
☆
विधवांच्या बंधनांचा
दूर केला अभिशाप
समतेची चळवळ
दूर करी भवताप..! ३
☆
रूढी जाचक अन्यायी
दिला जोरदार लढा
व्हावी सक्षम अबला
गिरविला नवा धडा..! ४
☆
ध्येयवादी पुरोगामी
सावित्रीची चळवळ
आंदोलन प्रबोधन
व्यक्त झाली कळकळ..! ५
☆
क्रांती ज्योत शिक्षणाची
ध्येय बंधुता समता
काव्य फुले गृहिणीची
नारी विकास क्षमता…! ६
☆
साऊ अशी, साऊ तशी
ज्योतिबांची क्रांती यात्रा
देण्या प्रकाश झिजली
ज्ञानदायी दिव्य मात्रा…! ७
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈