☆ कवितेचा उत्सव ??आयुष्याच्या या टप्प्यावर?? सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
आयुष्याच्या या टप्प्यावर आलो तेव्हा समजले |
खूप खूप झालं भोगून, सुख नि दु:ख पाहिले ||१||
वाटते आता पण, गेले त्याची खंत नको |
नकोशा क्षणांचे, गाठोडे बाळगणे नको ||2||
हव्याशा सुखद आठवांनाच पुन्हा आठवू या |
त्या स्मृतींच्या हिंदोळ्याचे हलके झोके घेऊ या ||3||
गतस्मृतींना उजाळा देताना रडायचे कशाला |
बळेबळे खोल जखमांना भिडायचे कशाला ||4||
नाही त्याने काही लाभ , नाही काही फायदा |
आपण आपल्या मनाप्रमाणे जगावे हाच आता कायदा ||5||
नको आता नाराजी नको ताप संताप |
देवधर्म करीत रहावे मनात नको काही पाप ||6||
वाचन मनन करीत रहावे चिंतन करावे ध्यानात |
योग्य व्यायाम , प्राणायाम मान राखावा जनात ||7||
मित्र मैत्रिणी जोडावे त्यांच्याशी समरस व्हावे |
शक्य तेवढी मजा करावी सोडून द्यावे हेवेदावे ||8||
उतारवयातले आयुष्य जावे सुखा समाधानात |
सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हीच इच्छा असेल मनात ||9||
माझे दोन शब्द समर्पित मित्र मैत्रिणींसाठी |
काही तरी चांगले करून पुण्य बांधू गाठी ||10||
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈