सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ स्वर्ग भूवरी … ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
वृत्त – समुदितमदना ( ८|८|८|३ )
☆
श्रीरामांचे मंदिर घडले भाग्य आपुले असे
उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||
*
स्वप्न पाहिले जे शतकांचे उतरे प्रत्यक्षात
सफल होतसे श्रद्धा भक्ती अवतरुनी सत्यात
गर्भागारी लोभसमूर्ती शोभूनी दिसतसे
उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||
*
अवतारी हा विष्णू झाला पुरुषोत्तम श्रीराम
चराचराला व्यापुन उरतो मंगलनिधान राम
मानसपूजा मनामनाची प्रत्ययास येतसे
उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||
*
भाग्याची ही मंगल वेळा अनुभवताना आज
अवघी अवनी लेवुन सजली आनंदाचे साज
नयनांपुढती बाल राम हा अवतरताना दिसे
उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||
*
श्रीरामांचे मंदिर घडले भाग्य आपुले असे
उभे ठाकले अतीव सुंदर स्वर्ग भूवरी दिसे ||
☆
साभार : राम – विकिपीडिया (wikipedia.org)
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈