डॉ. ज्योती गोडबोले
कवितेचा उत्सव
☆ ।। पैठणी ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
☆
माप ओलांडून येताना सासूबाईंनी भरली ओटी
भरजरी पैठणी देऊन म्हणाल्या पुत्र येऊ दे पोटी।
ही शकुनाची पैठणी बाई आपल्या घराची परंपरा
जप हो हिला जिवापाड हिचा नखरा आणि तोरा ।।1।।
☆
झगमगणारी पैठणी पदरावर जरीचे मोर
खरी जर चमकत होती तेजस्वी जशी चंद्रकोर
गर्द जांभळे काठ आणि हिरवेगार अंग
गर्भरेशमी स्पर्श आणि मुलायम रंग ।।2 ।।
☆
अजूनही तशीच देखणी ती तिला काळाचा स्पर्श नाही
मोठा माझा लेक आता दारी सून यायची बाई।
एकदा तिला दाखवली ही सुंदर पैठणी बघ बाई
हरखून जाऊन मला विचारते ,नक्की मला देणार ही आई?।।3
☆
तिच्याही सुनेला ती अशीच देईल ही पैठणी ओटी
भरून जुन्या परंपरा जपताना माझा उर येतो दाटून ।।
पैठणी नाही, हे तर संस्कार माझ्याकडे आलेले
सगळं सुनेकडे सोपवून मला निवृत्तीचे वेध लागलेले ।।5।……
☆
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈