श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊले त्याची पुढे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काय मोठे जाहले हो वर्ष आता संपले
वर्ष आणि एक पुढचे भिंतीवरी हे टांगले
पाऊले बारा अशी जो नित्यनेमे टाकतो
काळ त्याचे नाव आहे,ना कधी तो थांबतो
दुःख आणि सुख अथवा यश असो वा संकट
ना कधी तो भाववेडा,वा कधी ना उत्कट
जाहली वर्षे किती अन् राहिली पुढती किती
ना कधी तो रंगतो या आकड्यांच्या संगती
वार आणि तारखांचा खेळ आम्ही मांडतो
पुण्यतिथी वा जयंती ना कधी तो मानतो
वर्ष जाते,वर्ष येते,आयुष्य अपुले संपते
कालचक्राच्या गतीने क्षणक्षणाने खंगते
सोडूया संकल्प आणि देऊया वचने नवी
जाणतो आम्ही जरी ही सर्व ठरती अल्पजीवी
घालूनी हातात त्याच्या हात,आता चालणे
पाऊले त्याची पुढे अन् मागूनी हे धावणे.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुहास पंडित यांची ‘पाऊले त्याची पुढे’ही कविता खूप आवडली.सुखदु:ख,भावना यांचा मागमूसही नसलेला काळाचा अथक,अखंड प्रवासाचं अधोरेखन विचारप्रवृत्त करुन जातं…!