श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ गौरव… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
मोल नाही आज येथे संस्कृतीला
मानतो आदर्श कोणी रावणाला
*
ऐकतो आहे बहाणे रोज येथे
वाचवाया देश माझा राम आला
*
अंधश्रद्धा काय आहे हे कळाले
वास्तवाचा भ्रामकाशी वाद झाला
*
सौख्य कोठे सापडेना शोधताना
फक्त दिसतो घोषणांचा बोलबाला
*
भाकरीला कोणता पर्याय नाही
का उगी करता पुढे या दैवताला
*
गरजवंताना सुखाचे दान द्या ना
माणसाशी माणसांना जोडण्याला
*
बदलते वारे युगाचे ओळखावे
आणखी परतून लावा संकटाला
*
साधकाने साधना केली चुकीची
का उगा तो दोष देतो संचिताला
*
घातपाताचेच तुमचे ध्येय आहे
हतबलानो द्या निमंत्रण गारद्याला
*
कोणता पुरूषार्थ केला तेच सांगा
जन्म तुमचा सार्थ नाही गौरवाला
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈