श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 224
☆ परिपाठ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
जीव भांड्यात पडला
भांडे गॕसवर होते
आग देहाची या माझ्या
विस्तवाशी पक्के नाते
*
सखा हिरमुसलेला
शिट्टी वाजवी कूकर
परातीत पीठ पाणी
तव्यावरती भाकर
*
माझ्या हाताला चटके
त्याची भूक चाळवते
त्याला झुणका आवडे
बेसन मी कालवते
*
पहाटेला उठायाचे
रोजचाच परिपाठ
हाडे मोडती दिवसा
रात्री बिछान्याला पाठ
*
सुख दुःखाचा हा खेळ
त्याला संसार हे नाव
रुक्ष शब्दांनी केलेले
सारे लपवले घाव
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈