प्रा. सौ. सुमती पवार
☆ कवितेचा उत्सव ☆ मन पाखरू पाखरू….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
मन पांखरू पांखरू डहाळीवर झुलते
वारा आला कानापाशी आणि त्याच्याशी बोलते
मन पांखरू पांखरू आभाळातच उडाले
गरूडाच्या पंखावर कडेकपारीत गेले..
मन पांखरू पांखरू झाले हिरवे हिरवे
आणि फांद्या फांद्यावर दिमाखात ते मिरवे…
मन पांखरू पांखरू फुल पांखरूच झाले
गुलू गुलू हासतचं फुलांवरती डोलले …
मन पांखरू पांखरू झाले जास्वंदीचे पान
फुलताच पारिजात गंधाळले सारे रान…
मन पांखरू पांखरू झाले काटे कोरांटीच
आणि रातराणीचा हो झोका गेला पहा उंच…
मन पांखरू पांखरू आभाळात ..धरेवर
नाही येत चिमटीत फिरविते गरगर …
मन पांखरू पांखरू कधी खुपसते चोच
मग समजावे त्याला पहा लागली हो ठेच..
मन पांखरू पांखरू होत नाहीच शहाणे
रोज रोज गाई पहा गाणे नवेच … उखाणे..
मन पांखरू पांखरू रोज त्याच्या नाना कळा
असो कसे ही ..पण ..ते …
त्याचा लागतोच लळा…
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि: १८/०९/२०२०, वेळ : ११:२५ रात्री
(९७६३६०५६४२)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सौ. सुमती ताई पवार ह्यांची कविता *मन पाखरू पाखरू …… मनाला भावली. कविता वाचल्यानंतर आनंदित झालो व खूप छान वाटले.